जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने
साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील सामोडे मधील घोड्यामाळला पाणी देण्यास 17 गावांनी तीव्र विरोध दर्शवित याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 24 जून रोजी निदर्शने करण्यात आली.
तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी माध्यम प्रतिनिधी समोर भूमिका मांडताना आंदोलकांनी सांगितलं की, या विषयावर आम्ही अगोदरही प्रशासनाला निवेदने दिली आहेत. मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करीत आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळ असलेल्या सामोडे मधील घोड्यामाळला शासनातर्फे जल जीवन मिशन अंतर्गत जे पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे तो पूर्णपणे चुकीचा असल्याची परिसरातील सतरा गावांची भूमिका आहे. कारण या पाण्याची घोड्यामाळला गरजच नाही. तिथे अगोदरच तीन नद्यांचा त्रिवेणी संगम असल्याने भरपूर पाणी उपलब्ध आहे. घोड्यामाळला नेले जाणारे पाणी हे सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या नवेनगर, जेबापूर, पुनाजीनगर, दापूर, धंगाई, मोहाने, चिपी, चिखली, कुतरखाम इत्यादी 17 गावांच्या हक्काचे आहे. घोड्यामाची लोकसंख्या केवळ 2200 आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक घरे अतिक्रमित आहेत. एवढ्या कमी लोकसंख्या असलेल्या भागात अगोदरच भरपूर पाणी उपलब्ध असताना जल जीवन मिशन च्या नावाने पाणी नेण्याचा प्रशासन का घाट घालीत आहे? केवळ जलजीवन चा निधी खर्च करणे व त्यातून भ्रष्टाचाराला वाट करून देणे यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचा स्पष्ट आरोप आंदोलकांनी यावेळी केला. निवेदन देताना जिल्हाधिकारींनी आमच्या विषयावर कुठल्याही गांभीर्याने चर्चा केली नसल्याची नाराजी देखील आंदोलकांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केली. घोड्यामाळला पाणी दिल्यास आम्ही जलसमाधी घेऊ असा इशारा देखील आंदोलकांनी यावेळी दिला.













