संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील तलाठी, लिपिक, शिपाई व पुरवठा अधिकारी यांची तात्काळ बदली करून ही भ्रष्ट साखळी उध्वस्त करा या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 24 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी गळ्यात प्रतिकात्मक पाचशे रुपयांच्या नोटांच्या माळा घालून लक्ष वेधून घेतलं.
यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटले आहे की, नवीन, विभक्त, जीर्ण झालेले रेशनकार्ड, व ज्या नागरिकांनी कार्ड ऑनलाईन न केल्यामुळे त्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे, अश्या सर्व नागरिकांनी ऑनलाईन केल्यानंतर त्यांना तात्काळ PHH मध्ये समाविष्ट करून धान्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र करावे. धुळे शहरातील नागरिकांसाठी ईष्ठांक वाढवण्यासाठी शासनाला शिफारस करावी. संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, अपंग योजनेचे नागरिकांचे अर्ज तहसील कार्यालयात अनेक महिने पडून राहतात. सर्वसामान्य नागरिक चकरा मारून मारून थकून जातो. तरीही त्याचा अर्ज पुढे सरकलेला नसतो. त्याच वेळेस तहसील कार्यालयात दलालांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. परेशान नागरिकांना ते दलाल हेरून एका प्रकरणाचा रेट 5 ते 7 हजार रुपये दर सांगण्यात येतो. नागरिकांनी सहमती दर्शवली की व मग अडकलेल्या फाईलचा प्रवास चालू होतो. त्याचा अर्ज तात्काळ मंजूर करण्यात येतो. यामुळे दलाल, तलाठी अधिकारी यांचे संघनमत तर नाही ना, असे नागरिकांचे स्पष्ट मत तयार झाले आहे. जे नागरिक 4 ते 6 महिने चक्कर मारून सरळ मार्गाने काम होत नाही आणि दलालला पैसे दिले की तात्काळ काम होते ही वस्तुस्थिती बरेच नागरिक शिवसेना कार्यालयात येऊन शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे व महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्याकडे तक्रार करून सांगत आहेत. संजय गांधी विभागाच्या तहसीलदारांचा तलाठी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अजिबात वचक राहिलेला नाही हे यातून सिद्ध होते. म्हणून या सगळ्या भोंगळ कारभाराची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. धुळे तालुका तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा दलालांचा अड्डा बनला आहे. या कार्यालयात सर्वसामान्य नागरिक हे नवीन, विभक्त, जीर्ण झालेले रेशनकार्ड व ज्या नागरिकांचे ऑनलाइन न केल्यामुळे त्यांचे धान्य बंद झाले आहे, असे नागरिक पुरवठा अधिकारी व संबंधित कारकूनकडे आमचे काम करून द्या अश्या विनवन्या करत असतो, पण या सर्व पीडित नागरिकांचे म्हणणे कोणीही ऐकून घेण्यास तयार नसतो. पुरवठा कार्यालयात चक्कर मारून थकलेले नागरिकांना येथील आवारात व कार्यालयात बसलेले दलाल हेरून तुमचे काम तात्काळ करून देतो 3 ते 4 हजार रुपये लागतील सांगतात व मग फायनल झाले की त्यांचे काम मार्गी लागते. त्यामुळे नागरिकांना लुबाडणाऱ्या दलालांची साखळी तोडण्यात यावी. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.













