धुळे : निजामपूर पोलीस ठाणे येथे तब्बल ३० लाखांचा जप्त झालेला माल गायब झाल्याची धक्कादायक विषय समोर आला आहे. दोन पोलीस हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिस खात्यात बदनामीचा बॉम्ब फुटला आहे
निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून तब्बल ३० लाख ९१ हजार ४१० रुपयांचा जप्त मुद्देमाल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन पोलीस हवालदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला.या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नागेश्वर दशरथ सोनवणे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेले महेंद्र अमरसिंग जाधव आणि निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शरद तुकाराम ठाकरे यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या जप्त मुद्देमालाशी छेडछाड करून तो गायब केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.२०१६ ते २०२४ या कालावधीत विविध गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची अलीकडेच सखोल पडताळणी करण्यात आली होती. नोंदवही आणि प्रत्यक्ष कक्षातील मुद्देमालाची तुलना केली असता मोठी तफावत आढळून आली. अनेक गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी आढळून आला नाही, तर तो थेट गायब झाल्याचे स्पष्ट झाले. या गायब झालेल्या मुद्देमालात लाठ्या, काठ्या, मोबाईल हँडसेट तसेच अन्य किमती वस्तूंचा समावेश आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे लक्षात येताच ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सव्वा अकरा वाजता संबंधित दोन्ही पोलीस हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.












