धुळे : शहरातील गल्ली नंबर ४ मधील एक भांडी विक्रीचे दुकान फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आझाद नगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी ७०,७०० रुपये हस्तगत केले असून, त्याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
शनि मंदिरामोर असलेल्या ‘रमनलाल पुनमचंद जैन’ या भांड्यांच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने १७ डिसेंबरच्या रात्री चोरी केली होती. दुकान मालक सुरेश रमनलाल जैन (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने गल्ल्याचे कुलूप तोडून १,८०,००० रुपयांची रोकड आणि ५,००० रुपयांची चिल्लर असा एकूण १.८५ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३)(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
CCTV फुटेज ठरले निर्णायक
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी श्री. निवृत्ती पवार यांनी तातडीने तपास चक्र फिरवली. परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली असता, हा गुन्हा सराईत गुन्हेगार सद्दाम ऊर्फ बोबड्या दादा रशीद शेख याने केल्याचे निष्पन्न झाले.
चाळीसगाव चौफुलीवर लावला सापळा
आरोपी धुळे सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांनी खालील रक्कम जप्त केली:
५०० रुपयांच्या १२१ नोटा (६०,५०० रु.)
२०० रुपयांची १ नोट (२०० रु.)
१०० रुपयांच्या १०० नोटा (१०,००० रु.)
एकूण जप्त रक्कम: ७०,७०० रुपये.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. निवृत्ती पवार, पोसई समाधान सुरवाडे, रफीक पठाण, गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, शांतीलाल सोनवणे, संदिप कडरे, मनोज बागुल, विजय शिरसाठ, मकसुदखान पठाण आणि पंकज जोंधळे यांच्या पथकाने केली.












