धुळे: धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून १५ लाख ६० हजार रुपये किमतीचे १२० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
कुसुंबा येथील चोरीने लागला सुगावा दिनांक २४ ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान कुसुंबा येथील फिर्यादी वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे आणि अक्कलपाडा या भागात गेल्या दोन महिन्यांत वाढलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
१७ दिवसांचा थरारक पाठलाग आणि ३७५ कॅमेऱ्यांची तपासणी पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या विशेष पथकाने पारंपरिक खबऱ्यांचे जाळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कुशल वापर केला. पोलिसांनी परिसरातील आणि तब्बल तीन राज्यांच्या रस्त्यांवरील सुमारे ३७५ ANPR सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांच्या हालचाली टिपत, पोलिस पथकाने सलग १७ दिवस आरोपींचा माग काढला. अखेर गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील दाहोद व गोध्रा जिल्ह्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. धनंजय पाटील, पोहवा नितीन चव्हाण, उमेश पवार, कुणाल शिंगाणे, राजु पावरा, गजेंद्र मुंडे, राहुल देवरे, प्रतिक देसले, जयकुमार चौधरी, संजय पाटील आणि अमोल जाधव यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. कैलास माळी करत आहेत.












