धुळे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, बहुजन समाज पार्टीने (बसपा) आज प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मधील आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीत आघाडी घेतली आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचा मोठा प्रभाव असल्याने, येथे भाजप आणि बसपा यांच्यात ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बहुजन समाज पार्टीतर्फे आज (दि. ३०) जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, प्रभाग क्रमांक ९ मधून अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी (अ) अनिता सिद्धार्थ पारेराव, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी (क) पुनम विजय भामरे आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी (ड) ॲड. राहुल रमेश वाघ यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच प्रभाग क्रमांक ८ मध्येही पक्षाने तगडे उमेदवार दिले आहेत. यात अनुसूचित जाती प्रवर्गातून बहुजन समाज पार्टीचे सक्रिय पदाधिकारी व विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगताप यांना, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून मनीषा दिलीप ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.भाजप वि. बसपा: थेट लढतीची शक्यता
प्रभाग क्र. ८ आणि ९ या दोन्ही प्रभागांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणी मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे. स्थानिक राजकीय समीकरणांनुसार, या प्रभागांमध्ये भाजप आणि बसपा यांच्यात सरळ आणि चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी जाहीर करण्यात बाजी मारत बहुजन समाज पार्टीने प्रचारातही आघाडी घेतली असून, त्यांनी आतापासूनच मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.












