धुळे | विशेष प्रतिनिधी
दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत गाजलेला ‘बिनविरोध निवडीचा’ पॅटर्न आता धुळे महानगरपालिकेतही अवतरला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार रावल यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरवत, धुळे शहरातील वॉर्ड क्रमांक १ मध्ये भारतीय जनता पार्टीने खाते उघडले आहे. या वॉर्डातून उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड झाली असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि विशेषतः विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
काही दिवसांपूर्वीच दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यावेळी दोंडाईचा येथील या राजकीय खेळीची राज्यभर चर्चा झाली होती. त्याच वेळी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मंत्री जयकुमार रावल यांनी, “दोंडाईचाप्रमाणेच धुळे महानगरपालिकेतही आम्ही अनेक जागा बिनविरोध निवडून आणू,” असे सुचक वक्तव्य केले होते. त्यावेळी हे विधान राजकीय अतिशयोक्ती वाटत होते, मात्र आता प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपने आपली ही रणनीती यशस्वी करून दाखवली आहे.वॉर्ड क्रमांक १ मध्ये पहिला विजय धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘दोंडाईचा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या ठिकाणी उज्ज्वला भोसले यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने (किंवा अर्ज न आल्याने) त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपने एका जागेवर विजय मिळवल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विरोधकांचे धाबे दणाणले निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच भाजपने ‘बिनविरोध’चे खाते उघडल्यामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मंत्री रावल यांच्या रणनीतीनुसार अजून किती जागांवर हा पॅटर्न राबवला जाणार, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. उज्ज्वला भोसले यांच्या या विजयाने भाजपच्या ‘मिशन धुळे’ला जोरदार सुरुवात झाली आहे, असे मानले जात आहे.










