धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील निवडणुकीचे वातावरण तापले असून, येथील किन्नर आखाड्याच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी सत्ताधारी पक्षावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. “सत्ताधारी पक्षाकडून विरोधी उमेदवारांवर दबाव टाकला जात असून, पैशांचे आमिष दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे,” असा खळबळजनक दावा जोगी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
नेमका आरोप काय..?
प्रभाग क्रमांक १६ मधील उमेदवार पार्वती जोगी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमच्या प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवार आकांक्षाताई महाले यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी त्यांनी माघार घ्यावी, यासाठी पैशांची मोठी ऑफर दिली जात आहे. ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही स्वतः तिथे जाऊन संबंधितांना समज दिली. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे, त्यामुळे अशा प्रकारचे दडपशाहीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही.”
”हुकूमशाही सुरू आहे”
पार्वती जोगी यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “सध्या उघडपणे हुकूमशाही सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारांचे मन बदलण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर केला जात आहे. जर हे असेच सुरू राहिले, तर लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात येईल. आज जर आपण या विरोधात उभे राहिलो नाही, तर भविष्यात हुकूमशाही अटळ आहे. यामुळे आपल्या मुलांचे भविष्य आणि रोजगाराचे प्रश्न अंधारात जातील. बेरोजगारीवर कुणीही बोलायला तयार नाही, मात्र दबावाचे राजकारण जोरात सुरू आहे.”
जनतेला केले आवाहन”मी कोणाच्याही दबावाला घाबरत नाही आणि जनसेवेसाठी ठाम आहे,” असे सांगत जोगी यांनी मतदारांना जागृत होण्याचे आवाहन केले. “सध्या जे घडतंय ते लोकशाहीसाठी घातक आहे. नागरिकांनी आताच जागे होऊन मतदान केले पाहिजे आणि चांगला उमेदवार निवडून दिला पाहिजे. जर आपण आताच विरोध केला नाही, तर भविष्यात आपल्याला खूप त्रास सहन करावा लागेल,” असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.या आरोपांमुळे प्रभाग क्रमांक १६ मधील निवडणूक आता अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. आता यावर सत्ताधारी पक्ष काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










