सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
धुळे: शहरातील देवपूर भागात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) या दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे थेट गोळीबाराची घटना घडली असून, यात बंटी कांबळे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हिंसक चकमकीत एकूण ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, देवपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून दोन राजकीय गटांत सकाळपासूनच कुरबुरी सुरू होत्या. या वादाचे रूपांतर हाणामारीत आणि त्यानंतर गोळीबारात झाले. या चकमकीत बंटी कांबळे याच्यावर गोळी झाडण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बंटी कांबळे याला तातडीने शहरातील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या वादात दोन्ही गटांतील मिळून एकूण ५ जण जखमी झाले आहेत.
जुन्या वादाची किनार
हा प्रकार केवळ राजकीय नसून यामागे जुन्या वैमनस्याची (जुना वाद) किनार असल्याचेही बोलले जात आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा विषय केवळ निमित्त ठरला असून, जुन्या वादातूनच हा प्राणघातक हल्ला झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू आहे.
पोलीस ॲक्शन मोडमध्ये घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याद्वारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देवपूर भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सध्या जखमींवर उपचार सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे धुळे शहरात खळबळ उडाली आहे.












