विकासकामांवर विश्वास ठेवत विरोधकांची माघार
धुळे : धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतली असून, प्रभाग क्रमांक १७ ‘अ’ मधून भाजपचे युवा उमेदवार बंटी मासुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे भाजप गोटात उत्साहाचे वातावरण आहे.ज्येष्ठ नेत्यांच्या पाठिंब्यामुळे संधी आपल्या बिनविरोध निवडीनंतर प्रतिक्रिया देताना बंटी मासुळे यांनी यशाचे श्रेय पक्षश्रेष्ठींना दिले आहे.
ते म्हणाले की, “राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या आशीर्वादामुळे मला पक्षाची उमेदवारी मिळाली.”विकासासाठी सर्वांची साथ प्रभाग क्रमांक १७ ‘अ’ मध्ये बंटी मासुळे यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या इतर सर्व उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मासुळे म्हणाले की, “माझ्या विरोधात असलेले सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या विकासकामांवर विश्वास ठेवून एकवटले आहेत. पक्षाच्या विकासकार्याला मदत करण्याच्या हेतूने त्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.”बंटी मासुळे यांच्या बिनविरोध निवडीमुळे प्रभागातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले आहे.












