धुळे: “महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील राजकारण पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही खालच्या थराला नेऊन ठेवले आहे. गुंडगिरी, पैशांचे आमिष आणि जीवानिशी मारण्याच्या धमक्या हाच भाजपाचा नवा पायांडा बनला आहे,” असा घणाघाती आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी केला आहे. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या गुंड-बदमाशांना पायघड्या घालणाऱ्या भाजपाविरुद्ध बंडखोरांनी आता आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘सरकारमान्य गुंडगिरी’चा प्रकार
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गोटे यांनी म्हटले आहे की, सध्या महापालिका निवडणुकीत विरोधकांना प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. नामचीन गुंडांचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटला जात असून, ही ‘सरकार पुरस्कृत गुंडगिरी’ असल्याची टीका त्यांनी केली. सत्तेच्या जोरावर प्रशासकीय यंत्रणाही भ्रष्ट आणि लाचार करण्यात आली असून अधिकारी नियमांची पायमल्ली करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
३ अपत्ये असूनही उमेदवारी अर्ज वैध..?
प्रभाग क्रमांक १ मधील भाजपा उमेदवार श्रीमती योगिता संजय कुटे यांच्या उमेदवारीवर गोटे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “योगिता कुटे यांना तीन मुले असल्याचे पुरावे देऊनही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावरील हरकत फेटाळून लावली. तीन मुले असलेल्या महिलेचा अर्ज स्वीकारला जाणे हे बेकायदेशीर आहे. कायद्याचे राज्य संपून आता भाजपा कार्यालयातून कायदे मंजूर होत आहेत का?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.निष्ठावंतांची अवस्था दयनीय”ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट उपसले, त्यांना विश्वासात न घेता डावलण्यात आले आहे. आज भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते ढसाढसा रडत आहेत, तर जुन्या महिला नेत्यांच्या कानाखाली जाळ काढण्याचे प्रकार घडत आहेत. भाजपाला आता केवळ सतरंज्या उचलणारे आणि ‘जय’ म्हणणारे लाचार कार्यकर्ते हवे आहेत,” असेही गोटे म्हणाले.
बंडखोरांना ‘मर्द’ होण्याचे आवाहन
“चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करणाराच खरा मर्द असतो. तुम्ही बंडखोरीचे धाडस केले आहे, आता त्यावर ठाम राहा आणि आपली ताकद पक्षाला दाखवून द्या, जेणेकरून भविष्यात तुमची दखल घेतली जाईल,” असे आवाहन त्यांनी केले.या आवाहनाला शुभांगीताई पाटील, भगवान बापूजी करनकाळ, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील या नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. या पत्रकामुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.












