धुळे:शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील विविध विकासकामांचा ध्यास घेतलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज मांगल्यमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. सत्य साईबाबा सोसायटी येथील विठ्ठल मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात झाली.प्रभाग क्रमांक ९ मधून नशीब आजमावत असलेले उमेदवार संजय सुधाकर जाधव, लताबाई सोनार, पुनम शिरसाठ आणि प्रदीप बैरागी यांच्या प्रचारार्थ आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शहरातील दिग्गज राजकीय नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रचार शुभारंभ प्रसंगी विद्यमान आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉ. सुभाष भामरे आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी उपस्थित राहून उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात विधिवत पूजा करून आणि नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.यावेळी बोलताना नेत्यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मतदारांना केले.या शुभारंभ प्रसंगी परिसरातील नागरिक, ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.













