मोहाडी परिसरात भव्य प्रचार रॅली; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शहराच्या सर्वांगीण विकासाचा आणि प्रभागाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन प्रभाग क्रमांक १६ मधील उमेदवारांनी आपला प्रचार अधिक तीव्र केला आहे. आज मोहाडी परिसरात शिवसेना (शिंदे गट) आणि मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवारांनी भव्य प्रचार रॅली काढून मतदारांशी थेट संवाद साधला.
विकासाच्या मुद्द्यावर एकत्र
प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार डॉ. आकांक्षा चेतन महाले (अ), श्रीमती पार्वती परशुराम जोगी (ब), श्री. दीपक (बंटी भाऊ) खोपडे (ड) आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार जागृती प्रयाग बोरसे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या चारही उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे.
घरोघरी जाऊन साधला संवाद
आज सकाळी मोहाडी परिसरातून निघालेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. हातात भगवे ध्वज आणि विकासाच्या घोषणा देत उमेदवारांनी प्रत्येक गल्ली आणि घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. “धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणे आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळवून देणे हाच आमचा मुख्य संकल्प आहे,” असे आश्वासन यावेळी उमेदवारांनी दिले.
नागरिकांना भावनिक साद
रॅली दरम्यान उमेदवारांनी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांशी संवाद साधला. “आम्ही केवळ आश्वासनं द्यायला आलो नाही, तर तुमच्या हक्काचा विकास करण्यासाठी आलो आहोत. प्रलंबित रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला सेवा करण्याची संधी द्या,” अशी विनंती हात जोडून मतदारांना करण्यात आली.या रॅलीत स्थानिक पदाधिकारी, मोठ्या संख्येने महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि प्रभागातील नागरिक सहभागी झाले होते. मोहाडी परिसरातील ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले, ज्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात मोठी रंगत निर्माण झाली आहे.












