धुळ्याचा विकास भाजपच्याच काळात; शहराला पाणीटंचाईतून मुक्त करणार – मुख्यमंत्री
धुळे | “धुळ्याचा खरा विकास हा भाजपच्या काळातच झाला आहे. आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर काम करून दाखवतो. अक्कलपाडा योजनेमुळे धुळ्याची तहान भागली असली तरी, प्रत्येक घरात दररोज नळाला स्वच्छ पाणी येणे हे माझे स्वप्न आहे. धुळ्याचा कायापालट करण्यासाठी आणि या शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकवा,” असे आवाहन मुख्यमंत्री (देव भाऊ) यांनी धुळे येथे आयोजित जाहीर सभेत केले.

मिरची लागणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा!
नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावर काही विरोधकांना मिरची लागली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर प्रहार केला. “तुमको मिरची लगी तो मैं क्या करू?” असा टोला लगावत त्यांनी लोकसभेतील काँग्रेस खासदारांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आणि धुळ्याच्या विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे ठामपणे सांगितले.

पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांवर भर
धुळ्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “पूर्वी धुळ्यात १०-१० दिवसांनी पाणी येत होते. १७० कोटींच्या योजनेमुळे ही स्थिती सुधारली आहे. आता विस्तारीत ११ गावांच्या १४३ कोटींच्या योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून तापी योजनेची जुनी पाईपलाईन बदलण्याची मागणीही तातडीने मंजूर करण्यात येईल.”
झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे
शहरातील गरिबांसाठी मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्यातील अतिक्रमित झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आणि ‘पीआर कार्ड’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. केवळ पट्टा देऊन थांबणार नाही, तर मोदीजींच्या योजनेतून प्रत्येकाला पक्के घर मिळवून देऊ.”
धुळे विमानतळाचा विस्तार आणि रोजगार
धुळ्याच्या औद्योगिक विकासासाठी विमानतळ महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “जिथे विमानतळ तिथे उद्योग येतो. त्यामुळे धुळे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून इथून विमाने उडतील आणि तरुणांना रोजगार मिळेल, अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. तसेच एमआयडीसीसाठी २००० एकर जागा मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.”
’लाडकी बहीण’ आणि ‘लखपती दीदी’वर विश्वास
”काही लोक लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या गप्पा मारतात, पण जोपर्यंत तुमचा हा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली. येणाऱ्या काळात ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट असून, धुळ्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी यात पुढाकार घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
१५ तारखेला कमळाचे बटण दाबा!
समारोप करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “खानदेशची राजधानी असलेल्या या धुळ्याचा वर्तमान काळ बदलण्याची ताकद केवळ मोदीजींच्या नेतृत्वातील भाजपमध्ये आहे. १५ तारखेला कमळाचे बटण दाबून भाजपला विजयी करा, पुढची ५ वर्षे धुळ्याच्या विकासाची जबाबदारी माझी असेल.”
१७० कोटींची अक्कलपाडा पाणी योजना यशस्वी.
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचा पट्टा आणि पक्के घर देणार.विमानतळ विस्तार आणि २००० एकर जागेचा प्रश्न मार्गी लावणार.’लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार, महिलांना ‘लखपती दीदी’ करणार.












